रायरेश्वराचं किल्ला, इतिहासाचं अभिमान, हे स्थान वीर शिवाजींचं, भूषण महाराष्ट्राचं

३७७ वर्षांपासून स्वराज्याच्या महोत्सव साजरा करणारा गड

कडे रांगडे सह्याद्रीचे, जशी पहाडी छाती,

जोश तांबड्या मातीचा,टिळा जणू लल्लाटी.

याच सह्याद्रीच्या तांबड्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते ठिकाण म्हणजे ‘रायरेश्वर’ यालाच साक्षी मानून महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला. ‘रायरेश्वर’ हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून याचे पुण्यापासूनचे अंतर ८७ किलोमीटर एवढे आहे येथे पोहोचण्यासाठी साधारणतः अडीच तास एवढा वेळ लागतो. 

रायरेश्वरला पोहोचण्यासाठी वाई व भोर असे दोन मार्ग आहेत, जाताना रस्त्यात रोहिडा व केंजळगड हे दोन गडही लागतात. नागमोडी घाट रस्ता पार करून आपण रायरेश्वर पायथ्याला जाऊन पोहोचतो गडावर जाण्यासाठी लोखंडी पायऱ्या आहेत. पायऱ्यांवर चढून गेल्यास समोर विस्तृत पसरलेले रायरेश्वर पठार आपणास दिसते. 

पुढे चालत जातात सर्वात आधी आपल्याला दिसते ते म्हणजे गोमुख तळे वर्षभर वाहणाऱ्या नितळ पाण्याचा स्त्रोत. थोडे चालून जाता समोर दर्शन होते ते रायरेश्वर देवालयाचे, याच देवालयाच्या शिवलिंगावर छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. 

मंदिराची बांधणी अत्यंत साधी आहे त्यामुळे निश्चित बांधणीचा कालखंड सांगता येत नाही, मात्र सभा मंडपातील शिलालेखावरून कळते की, १६०५ मध्ये राझर गावातील शंकर लिंग पाटील यांनी रायरेश्वर महादेवाचे शिवालय बांधले. त्या शिवालयाचा जिर्णोद्धार हरी पाटील यांनी शके १८०५ मध्ये केला त्यासाठी ७०० रुपये खर्च झाला. शिलालेखाच्या मजकुरावरून असे लक्षात येते की रायरेश्वराचे मूळ मंदिर हे सन १६८३-८४ म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात बांधले गेले. 

या पठारावर आपल्याला पांडवकालीन लेणी सुद्धा पाहायला मिळतात. ध्यान करण्यासाठी त्या बांधल्या गेल्या असाव्यात कारण त्यांची खोली जास्त नाही. 

रायरेश्वरावरील शिवमंदिरानंतर सर्वात जास्त प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘सात रंगांची माती’ जिथे मिळते ते ठिकाण यालाच ‘विभूत खान’ असेही म्हणतात. विभूत म्हणजे प्रशंसनीय. हे ठिकाण आहे तसेच एकाच ठिकाणी सहा वेगवेगळ्या रंगांच्या सात छटा असलेली माती इथे एकाच ठिकाणी मिळते. सह्याद्रीमध्ये हे एकमेव ठिकाण आहे. 

भूभर्ग शास्त्राचे अभ्यासक सांगतात की बेसॉल्ट खडकांवर भरपूर व अधिक काळासाठी आर्द्रता  यामुळे खडकातील हलके पदार्थ वाहून जातात व जी जड खनिजे उरतात त्यामुळे मातीला हे रंग प्राप्त होतात. यामध्ये रासायनिक प्रक्रिया व सह्याद्रीत इतरही ठिकाणी अशी माती आढळते का ? या संबंधाचे संशोधन पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये सुरू आहे.

 सर्वात शेवटचे टोक म्हणजे अस्वल तलाव हे ठिकाण नाखिंदा पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. याव्यतिरिक्त गडावर विविध शिवकालीन टाके आहेत जसे की वारजोत, देऊळ टाके पावसाळ्यात गडावर भेट दिल्यास विविध प्रकारच्या फुलांनी पठार भरलेला दिसतो यामधील बरीच फुले IUCN RED LIST मध्ये समाविष्ट आहेत.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ द्वारे पुणे जिल्ह्यातील तीन किल्ल्यांचा विकास कार्यक्रम हाती घेतलेला आहे , त्यामध्ये रायरेश्वर पठाराचा समावेश आहे. निसर्गरम्य ऐतिहासिक पठारावर पर्यटकांच्या सोयीसाठी रस्ते बाक दिवे अशा प्रकारच्या काही प्राथमिक सोयीसुविधा पुरविण्याचा प्रस्ताव आहे, मात्र काही प्रशासकीय अडचणींमुळे हे काम अर्धवट राहिले आहे. लवकरच सगळ्या अडचणी दूर होऊन काम पूर्ण व्हावे ही इच्छा आज आपण भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होऊन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत, मात्र हा रायरेश्वर गेले ३७७ वर्षे स्वराज्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे.

संदर्भ

शिलालेखांच्या विश्वात महेश तेंडुलकर