स्वराज्याचा बिनीचा शिलेदार रोहिडा

पुणे जिल्ह्यातील भोर शहराच्या दक्षिणेस सुमारे सहा किलोमीटर अंतरावर वसलेला लहानसा मात्र तितकाच मजबूत किल्ला म्हणजे रोहिडा किल्ला यालाच विचित्रगड व बिनीचा किल्ला असेही म्हणतात.

या किल्ल्याची निर्मिती यादवकालीन आहे. अनेक वर्षे हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात असल्याचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६४८ मध्ये जिंकून घेतला व या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख महाराजांना येऊन मिळाले. महाराजांनी याच काळात गडाचे नामकरण विचित्रगड असे केले.

इसवीसन १६६६ च्या पुरंदरच्या तहामध्ये जे २३ किल्ले मुघलांना देण्यात आले त्यात रोहिडा हा किल्ला सुद्धा होता. २४ जून १६७० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत स्वराज्यात सामील केला. पुढे १७०० मध्ये भोर संस्थान शंकराजी नारायण सचिव यांना मिळाले आणि हा किल्ला संस्थानाकडे राहिला, संस्थान विलगीनीकरणापर्यंत किल्ला संस्थानाकडेच होता.

गडावर जाण्यास मार्ग

गडाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारवाडी गावापासून गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत पायवाटेचा रस्ता आहे. परंतु अलीकडे भाबवडी गावातून भोरदरा मार्गे सुद्धा आपण गडावर जाऊ शकतो, हा मार्ग तुलनेने थोडा अवघड आहे. कारवीच्या दाट झाडी मधून वाट काढत जाताना प्रथम वाघजाई देवीचे प्राचीन मंदिर लागते. देवीचे दर्शन घेऊन अर्धा तास पायवाटेने आपण गणेश दरवाजास येऊन पोहोचतो.

गडावर पाहण्यासारखी ठिकाणे

दरवाजे

गडाचे सर्व दरवाजे एकमेकांना काटकोनात आहेत.

गडाचा पहिला दरवाजा म्हणजे गणेश दरवाजा, दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मेहरब कोरलेले आहे.

पुढे पंधरा-वीस पायऱ्या चढून गेल्यावर दुसरा दरवाजा लागतो, येथे पहारेदाराच्या देवळ्या पाहायला मिळतात. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे याला लागून असलेले भूभर्गातील पाण्याचे टाके; यास बाराही महिने पाणी असते.

पुढे आणखी काही पायऱ्या चढून गेल्यास तिसरा दरवाजा लागतो. अत्यंत मजबूत बांधणीचा हा दरवाजा आदिलशहाच्या काळात बांधलेला आहे. दरवाजाच्या महिरप कमानीच्या दोन्ही अंगास कमळे व माशांच्या आकृत्या आहेत, तर वरच्या बाजूस डावीकडे चंद्र तर उजवीकडे सूर्य आहेत. कमानी बाहेर भिंतीवर दोन्ही अंगास अर्धव्यक्त हत्ती आहेत. याच दरवाजाच्या डाव्या हातावरील भिंतीवर मराठी व उजव्या हातावरील भिंतीवर फारसी भाषेत शिलालेख आहेत.

शिलालेख

या शिलालेखाचे वाचन इतिहास अभ्यासक ग. ह. खरे यांनी केले आहे.

मराठी शिलालेख                            फारसी शिलालेख

१. हजरत सुलतान महं                       १. ह्ज्र्त सुलतान मुहम्मदशहा पादशाह

२. पद पादशाहा साहेब का                     २. साहिब ई तअ्मीर दर्वाझह हीन

३. रर्कीर्द वीठळ मुदगळ                       ३. बोसवार वीथल मुदगलराव

४. राव हवाळदार कीळे रोही                    ४. हवालदार किल्अह रोहीरह दर सनह

५. डा दु [मूर्ख] संवछरे सके                    ५. सनह १०५६

अर्थ :  शालिवाहन शकाच्या १५७८ व्या वर्षी दुर्मुखनाम संवत्सरातील चैत्र शुद्ध प्रतिपदा रविवार ते ज्येष्ठ शुद्ध दशमी शुक्रवार या कालावधीत मुहम्मद आदिलशहाच्या कारकिर्दीत विठ्ठल मुदगलराव हा रोहिडा किल्ल्याचा हवालदार असताना या दरवाजाचे बांधकाम पूर्ण झाले किंवा दरवाजा बांधला गेला.

सदर व राजवाड्याचे अवशेष

गडाच्या तिसऱ्या दरवाज्यातून प्रवेश केल्यावर लगेच डाव्या हाताला सदरचे व राजवाड्याचे अवशेष पाहायला मिळतात. हा राजवाडा किल्लेदाराचा असावा तसेच अलीकडे झालेल्या उत्खननामध्ये मातीच्या भांड्यांचे आणि जात्याचे अवशेष सापडले आहेत.

रोहिड मल्लाचे मंदिर

सदरेच्या मागील बाजूस तलावाजवळ रोहिड मल्लाचे मंदिर आहे. मंदिराच्या मध्यभागी भैरवाची मूर्ती आहे तर डाव्या हातावर गणपती आणि उजव्या हातावर भैरवी ची मूर्ती आहे आणि त्यासमोर शिवलिंग आहे. मंदिरासमोर आपल्याला काही थडगी सुद्धा पाहायला मिळतात.

टाके

गडाच्या उत्तर भागात पाण्याच्या टाक्यांची माळ पाहायला मिळते, टाक्यांची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे की एका मागे एक टाके भरत जातात. येथेच एक भूमिगत टाक्याजवळ शिवपिंड व त्याजवळ बसलेली मानवी मूर्ती आहे. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात असलेली टाकी व चुन्याचा घाणा यावरून असे लक्षात येते की नंतरच्या काळात मोठ्या प्रमाणात बांधकाम झाले असावे.

बुरुज

किल्ल्यावर एकूण सात बुरुज आहेत. आग्नेयस शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघजाई बुरुज व पूर्वेस फत्ते बुरुज व सदरेचा बुरुज, शेवटी सर्जा बुरुज.

गडावरील सर्वात मजबूत बांधणीचे बुरुज म्हणजे वाघजाई बुरुज आणि शिरवले बुरुज. भक्कम बांधणीच्या या लढाऊ बुरुजांना पायऱ्या आहेत, वाघजाईच्या बुरुजावरून दूर असलेल्या वाघजाई देवीचे दर्शन होते.

शिरवले बुरुज आग्नेय बाजूला असून हा अत्यंत मजबूत आणि उत्तम बांधणीचा आहे. शिरवले बुरुजाच्या तटामध्ये दडवलेली एक शौचकुपही उत्तम अवस्थेत आहे.

आणखी एक महत्त्वाचा बुरुज म्हणजे सर्जा बुरुज. याचे वैशिष्ट्य म्हणजे याचे स्थापत्य, बुरुजाच्या आतील बाजूस गोलाकार खांब बांधलेला आहे. या खांबावर बुरुजाचे छत उभारले गेले होते, काळाच्या ओघात गडाचे छत कोसळले मात्र खांबाचे अवशेष आजही पाहायला मिळतात.

सर्जा बुरुज आणि वाघजाईचा बुरुज यामध्ये उत्तम तटबंदी अजून शाबूत आहे. यामध्येच एक छोटा चौकोनी दरवाजा म्हणजे चोर दरवाजा आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत रोहिडा किल्ल्यावर विकास काम करण्याचा प्रस्ताव आहे, त्या अंतर्गत गडावर बाक सूचनाफलक बसविण्यात आले आहेत.

यादवकाळी जन्मलेला हा बिनीचा शिलेदार आता थकला आहे. तटबंदीची पडझड चालूच असते. मात्र काही महिन्यापूर्वी गडाचे प्रथम द्वार म्हणजे ‘गणेश दरवाजा’ हा कोसळला. गडाची इतरही हानी होऊ नये याकडे आपण सर्वांनी लक्ष द्यायला हवे.

किल्ले हे महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. ते जपणे हे शासनाबरोबरच आपल्या सर्वांचेही कर्तव्य आहे.

संदर्भ

शिलालेखांच्या विश्वात – महेश तेंडुलकर

IMG_20221211_144533.jpg