मनाला मोहणारा मोहनगड

मोहन गड नाव बऱ्याच लोकांना कदाचित माहीत नसेल, कारण तुम्ही आम्ही सगळेच बऱ्याचदा याचा उच्चार केंजळगड असा करतो.

तब्बल सव्वाचार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगर रंगांमध्ये आहे. रोहिड्याची डोंगररांग उतरताना नैऋत्य दिशेला एका भल्या मोठ्या पहाडाच्या डोक्यावर गांधी टोपीच्या आकाराचा केंजळगड अधून मधून दर्शन देतो. यालाच केळंजा किंवा मोहनगड असे म्हणतात.

केंजळगड हा कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील डोंगर रांगेमध्ये आहे. गडावरून कृष्णा नदीवरील धोम धरणाचे जलाशय पाहायला मिळते तसेच आजूबाजूचा प्रदेश हा नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेला आहे. गडाच्या आजूबाजूचे सौंदर्य बघून छत्रपती शिवाजी महाराजांनी गडाला मोहनगड असे नाव दिले. गडाच्या पायथ्याला सपाटीवर पाच सात खोपटांची वस्ती आहे तिला ‘ओव्हरी’ असे म्हणतात व मागे केंजळाचा भला मोठा दगड उभा आहे.

इतिहास

१२ व्या शतकात भोजराजाने गडाची निर्मिती केली. सन १६४८ मध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात होता. सण १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मुक्काम चिपळूण शहरात पडला. वाई आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले महाराजांच्या ताब्यात होते, मात्र केंजळगड अजून ताब्यात आला नाही म्हणून महाराजांनी केंजळगड घेण्यासाठी आपल्या फौजा पाठवल्या. गंगाजी विश्वासराव किरदत्त हा किल्ल्याचा किल्लेदार होता. त्याने मराठ्यांना चोख प्रत्युत्तर दिले, मात्र तो मराठ्यांकडून मारला गेला आणि २४ एप्रिल १६७४ रोजी किल्ला स्वराज्यात सामील झाला. सन १७००  पर्यंत किल्ला स्वराज्यातच होता, पुढे १७०१ मध्ये किल्ला मुघलांकडे गेला मात्र लगेच एका वर्षात म्हणजेच १७०२ मध्ये परत मराठ्यांच्या ताब्यात आला

या किल्ल्याची किल्लेदारी ‘पिलाजी गोळे’ यांच्या घराण्याकडे असल्याची शिवकालीन ते शाहू कालखंडापर्यंत नोंद मिळते. पुढे २६ मार्च १८१८ साली ब्रिटिश अधिकारी जनरल प्रिट्झलर याने गडाचा ताबा घेतला. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शेवटची लढाई याच परिसरात झाली.

गडावरील दृश्यॆ

महादेव डोंगररागेच्या नाकाडावर बसलेला भलामोठ्या काळ्या पहाडाच्या माथ्यावर बरीच झाडी व गवत माजलेले आहे. गडावर जाताना आपल्याला एका दगडात कोरलेले पाण्याचे टाके पाहायला मिळते, पुढे चालून गेल्यास गडाचे प्रमुख वैशिष्ट्य आणि प्रमुख आकर्षण म्हणजे कातळात कोरलेल्या पायऱ्या बघायला मिळतात. पायऱ्यांच्या खाली मोठी गुहा आहे. या गुहेत काळ्या रंगाचे कोळी मोठ्या संख्येने आढळतात. पायरांच्या सुरुवातीला दोन्ही बाजूंनी देवळीचे अवशेष पाहावयास मिळतात, पायऱ्या जिथे संपतात तेथे पूर्वी दरवाजा होता हे सांगणारे जोते फक्त दिसते.

गडाच्या माथ्यावर

गडाचा माथा गाठठाच पुढे तटाजवळ प्रशस्त खोदलेले तळे पहावयास मिळते. गडाचा घेर हा लंबवर्तुळाकारछोटासा आहे. चारही बाजूंनी ताशीव कातळ कडे आहेत. तटबंदीचे अवशेषही पाहायला मिळतात.

गडावर पडझड झालेला एक बुरुज, सुकलेले टाके व काही इमारतीचे अवशेषही आढळतात. गडावर एक मजबुती इमारत आढळते तिची रचना कोठार्‍यासारखी आहे. गडावर आढळलेल्या विटांच्या बांधकामावरून इमारत पेशवेकालीन असावी. गडावर दोन चुन्याचे घाणे पहावयास मिळतात यावरून गडावर भरपूर बांधकाम झाल्याचे लक्षात येते. गडावर जुन्या मंदिराचे अवशेष आढळतात, छप्पर नसलेल्या या मंदिरात केंजळाई देवीची मूर्ती आहे. या गडावर सगळीकडे डोक्यापर्यंत येईल असे गवत वाढलेले असल्यामुळे गडावरील अवशेष शोधणे कठीण आहे.

केंजळगडाचा एकंदर विचार करता हा गड जिंकण्यास कठीण आहे, मात्र मराठ्यांच्या जिद्दीमुळे तो लढवला गेला व जिंकलाही गेला. महाराष्ट्रातील अशाच दुर्गांनी औरंगजेबाला २६ वर्ष कडवी झुंज दिली. जेव्हा गड ब्रिटिशांच्या ताब्यात गेला तेव्हा एका इंग्रजाने केंजळगडाबद्दल लिहिले आहे की ‘जर हा किल्ला दृढनिश्चयने लढला तर तो जिंकणे फार अवघड आहे’.

संदर्भ

स्वराज्यातील किल्ले

IMG_20221105_112107