स्थापत्यशास्त्रातील एक कोड – त्रिशुंड गणपती भाग १

सांस्कृतिक राजधानीतील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव तसे येथे सर्वच उत्सव मोठ्या थाटात साजरे केले जातात, मात्र गणेशोत्सवाची गोष्टच वेगळी आहे. दगडूशेठ हलवाई गणपती असो की मानाचे पाच गणपती अगदी गल्ली गल्लीतील सर्वच काही ना काही इतिहास सांगतात, असेच एक अत्यंत महत्त्वाचे व ऐतिहासिक गुढ साधून असलेले अठराव्या शतकातील एक गणेश मंदिर पुण्याच्या सोमवार पेठेत तटस्थपणे उभे आहे मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे बहुतांश पुणेकरांना या दुर्मिळ गणपतीची कल्पना नाही.

त्रिशुंड गणपती असे नाव धारण केलेल्या गणपतीचे प्राचीन मंदिर पुण्याच्या सोमवार पेठेत नागझरी नावाच्या मोठ्या ओढ्याच्या ताटावर बांधले आहे. शहाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत या भागात पेठ वसवली व त्यास शहापूर असे नाव दिले व पुढे पेशवाईत ही पेठ सोमवार पेठ म्हणून प्रसिद्ध झाली. या परिसरात गोसावी लोकांची खूप वस्ती असल्यामुळे या परिसरास गोसावी पुरा असेही म्हणत.

गोसावी लोक अत्यंत धनी व सावकारी व्यवसायातील होते त्यांच्या वस्तीजवळ त्यांच्या गुरूंची समाधी असलेले स्मशानही होते. समाधान च्या जवळ मंदिर उभारण्याची परंपरा आहे अशाच प्रकारचे एक समाधी मंदिर म्हणजे त्रिशुंड गणपती मंदिर होय.

त्रिशुंड मंदिर हे समकालीन मंदिरांपेक्षा खूप देखणे आहे संपूर्णपणे काळ्या पाषाणात बांधलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे.

भीम गिरीजी गोसावी नावाच्या इंदूर जवळील धामपूर गावच्या सधन व्यक्तीने या मंदिराची निर्मिती सुमारे १७५४ ते १७७० या कालावधी दरम्यान केली. मात्र काळाच्या ओघात पुणेकरांना या वास्तूचा विसर पडला एवढेच काय १९१७ पर्यंत सरकारी नोंदीत सुद्धा मंदिराला मालक नव्हता.

मंदिराच्या समोरील झाडाची फांदी जवळच्या नेरलेकर यांच्या घरात गेली म्हणून त्यांनी पालिकेत या संदर्भात तक्रार केली तेव्हा पालिकेने चौकशी केली, मंदिराचे मालक इंदूर येथील गोसावी नावाचे गृहस्थ असल्याचे समजले त्यांना इंदूर वरून बोलवून आणले त्यांनी झाड समोर तोडून काढले मात्र यामुळे मंदिराचे चित्र बदलले नाही पण ते अतिशय बिकट झाले ते असे की गोसावी यांनी मंदिराच्या पुढच्या भागात लाकडाचे वखार चालू केले व सभामंडपाला कोळशाचे गोदाम केले व ही वखार कुलकर्णी नावाच्या मित्राला देऊन ते पुन्हा इंदूरला परत गेले या सगळ्यात मंदिराचे वैभव मात्र लपले.

मंदिराची दशा दिवसेंदिवस खराब होत चालली होती; काळाच्या ओघात मंदिराचे शिखरही नष्ट झाले येथे मंदिर होते हेही लोकांचे लक्षात येत नव्हते. १९३२ ते १९५२ या कालखंडात तर मंदिराची अवस्था फार वाईट होती सभामंडपात वखार अंगणात गोठा व कोळसा साठविण्याची जागा तळघर तर घाण पाण्याने संपूर्ण भरले होते.

१९५१ मध्ये ठाण्यातील गणेश भक्त यशवंत अनंत मोरे यांना नागझरी ओढ्याच्या काठावरील गणपती मंदिराचा दृष्टांत झाला व त्यानंतर त्यांनी येथे साफसफाई केली व मंदिर वहिवाटीस योग्य केले असे सांगितले जाते तेव्हापासून मंदिरात येजा सुरू झाली.मंदिराच्या स्थापत्य बद्दल जाणून घेण्यासाठी नक्की वाचा भाग दोन

संदर्भ

शिलालेखांच्या विश्वात – महेश तेंडुलकर

IMG_20221009_170513